लोकल प्रवासाच्या परवानगीसाठी शिक्षक आक्रमक ; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं कायदेभंग आंदोलन

Continues below advertisement

मुंबई : मुंबईतील शिक्षकांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कायदेभंग आंदोलन पुकारलं आहे. परवानगी नसताना सुद्धा शिक्षक लोकलमधून प्रवास करणार आहेत. यासाठी शिक्षक दंड भरायलाही तयार आहेत. शिक्षकांना दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या कामासाठी शाळेत जाण्यासाठी लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्या, अन्यथा 20 दिवसात शाळांनी निकाल तयार करण्याचा कालावधी वाढवून द्या, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

मुंबईच्या शाळांमध्ये शिकवणारे अनेक शिक्षक हे उपनगरात राहतात. हे शिक्षक वसई, विरार, पालघर, कल्याण, पनवेल या ठिकाणाहून येतात. लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असल्याने शिक्षकांना सुद्धा त्यामध्ये परवानगी मिळावी जेणेकरुन निकालाचे काम तातडीने पूर्ण करता येईल अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.  याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून तातडीने शिक्षकांना परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. 

एकीकडे दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे काम सुरु आहे तर दुसरीकडे शाळा बंद असल्यातरी उद्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यापालन नेमके कसे करावं याबाबत राज्यभरातील शिक्षकांचे 10 जून रोजी यू ट्यूबवर प्रशिक्षण पार पडलं. 30 जूनपर्यंत शिक्षकांना राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि गृहपाठ घेण्यासोबतच विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याचं काम करायचं आहे. दहावीचा निकाल तयार करण्यासाठी नववीचे गुण पण त्यात समाविष्ट करायचे असून हे काम शिक्षकांना शाळेत जाऊन करावं लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी मागील काही दिवसांपासून शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. 

आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून शिक्षकांना लोकलमध्ये परावनगी नसताना कायदेभंग करुन काही शिक्षक प्रवास करत शाळेला निघाले. लोकलमध्ये परवानगी नसताना प्रवास करताना दंड भरावा लागला तरी दंड भरुन प्रवास करु, पण लोकल प्रवास शिक्षकांना महत्त्वाचा असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram