Maharashtra Mumbai Rain Updates : मुंबई आणि उपनगरात पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग
Maharashtra Mumbai Rain Updates : मागील काही तासांमध्ये मुंबई (Mumbai) , कोकण (Konkan) तसेच, राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मुंबईत गेल्या एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल (सोमवारी) दिवसभर मुंबईत पावसाच्या रिमझीम सरी कोसळत होत्या. तसेच, मध्यरात्रीही पावसाची उघडझीप सुरु होती. अशातच गेल्या तासाभरापासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून संपूर्ण मुंबई शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं अंधेरी सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. काही गाड्या सबवेमध्ये अडकल्या असून काही गाड्या साचलेल्या पाण्यामुळे बंद पडल्या आहेत.
पावसाचा जोर असाच जर काहीवेळा कायम राहिला तर पश्चिम उपनगरांत सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. कुर्ल्यात मागील एका तासात 39 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर चेंबूरमध्ये देखील धुवांधार पाऊस कोसळत आहे. चेंबुरमध्ये मागील एका तासात 32 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.