Kishori Pednekar UNCUT : ...अन्यथा माफी मागा, महापौरांचं शेलारांना आव्हान
मंबई : अभिनेत्री करीना कपूर (Kareena kapoor) आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्माता दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar Party) आयोजित केलेली पार्टी चांगलीच चर्चेत आली आहे. या पार्टीला राज्य मंत्री मंडळातील मंत्री उपस्थित होते. असा आरोप भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला होता. आज आशिष शेलार यांच्या या आरोपाला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आव्हान दिले आहे. "खोटे आरोप करू नका, त्या पार्टीत जे मंत्री सहभागी झाले होते. ते सिद्ध करा, नाहीतर जनतेची माफी मागा" असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना दिले आहे.
करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासह इतर आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्टीवरून बरेच वाद निर्माण झाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही गंभीर आरोप केले होते. या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील ( Maharashtra Government) एक मंत्री सहभागी झाले होते असा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या या आरोपाला BMC महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आव्हान दिले आहे. पेडणेकर यांनी यावेळी शेलार यांच्यावर कडाडून टीकाही केली.