फळ, भाजी विक्रेत्यांचे वजन काटे दगडाने ठेचून तोडले, KDMC च्या कर्मचाऱ्यांची कारवाई की दादागिरी?
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण पथकाची दबंगगिरी एका व्हिडियोच्या माध्यमातून समोर आली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूर वाडी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या फळ भाजी विक्रेत्यांवर कारवाई करताना पालिकेच्या पथकाने त्यांचे वजन काटे जप्त केले. इतक्यावरच हे कर्तव्यदक्ष कर्मचारी थांबले नाहीत तर त्यांनी दबंगगिरी करत हे वजन काटे अक्षरशः दगडाने ठेचून तोडले. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. घडल्या प्रकाराबाबत फेरीवाल्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. कोरोनामुळे आधीच दोन वर्षापासून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आता कुठे थोडा दिलासा मिळाला होता , कोरोना नियमांचे उल्लंघन करत मोठ मोठी दुकानं सुरू असतात. पालिकेचे पथक त्यांच्याकडे कानाडोळा करते मात्र फेरीवाल्यांवर अशी कठोर कारवाई केली जाते. इतकंच नाहीतर दगडाने ठेचून वजन काटे तोडतात हा दगड त्यांनी वजन काट्यावर नाही तर आमच्या पोटावर घातल्याची उद्विग्न प्रतिक्रिया फेरीवाल्यांनी दिली.