मुंबईच्या समुद्रात भरकटलेल्या दोन जहाजांच्या मदतीसाठी नौदलाची धाव; 146 जणांना रेस्क्यू करण्यात यश
मुंबई : तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या मच्छिमारांसाठी नौदलाचे देवदूत धावून आलेत. काल रात्रभर सुरु असलेल्या ऑपरेशन दरम्यान 273 पैकी 146 जणांचे प्राण वाचवण्यात भारतीय नौदलाला यश आलं आहे. अनेकांना एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. चक्रीवादळात अनेक बोटी आणि जहाजं खवळलेल्या समुद्रात अडकून पडलेल्या होत्या. नौदलानं ऑपरेशन राबवत बोटी आणि जहाजांवर अडकलेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदत कार्य सुरु केलं. त्यासाठी नौदलाची बचाव मोहीम रात्रभर सुरु होती. तोक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या पी-305 या नौकेवरच्या कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी आज सकाळी भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर्स रवाना झाली आहेत. मुंबईच्या समुद्रातील आयएनएस शिख्रा या युद्धनौकेवरून ही हेलिकॉप्टर्स रवाना झाली.
एसएआर ऑपरेशन्स संपूर्ण रात्रभर सुरु राहिलं आणि आज सकाळी 6 वाजेपर्यंत 146 लोकांना रेस्क्यू केलं गेलं. ज्यामध्ये 111 आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकातानं 17 जणांना, तर ओएसव्ही ग्रीटशिप अहिल्या आणि ओएसव्ही ओशन एनर्जीद्वारे 18 जणांना वाचवले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आणि खवळलेल्या समुद्रात हे कार्य करण्यात आलं. 137 जणांसह जहाजातील 'गॅल कन्स्ट्रक्टर' हे कुलाब पॉइंटच्या उत्तरेकडील 48 एनएम उत्तरेकडे चालले आहे. इमरजेंसी टोव्हिंग वेसल 'वॉटर लिली', दोन सपोर्ट वेसल आणि सीजीएस सम्राट कर्मचार्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.
दरम्यान, आज सुरु असलेल्या बचाव प्रयत्नांना आज सकाळी भारतीय नौदल पी8 आय विमानाने नजर ठेवली जात आहे. हवामानाच्या परिस्थितीनुसार, एसएआरसाठी भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर तैनात केली जातील. सध्या सुरु असलेल्या एसएआरला वाढविण्यासाठी अधिक नौदल प्रयत्न दिवसभर सुरु राहतील.
दरम्यान, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यानंतर विध्वंसक तोक्ते चक्रवादळ सोमवारी (17 मे) रोजी रात्रीच्या सुमारास गुजरातच्या समुद्रकिनारी धडकलं. यादरम्यान चक्रीवादळाचा वेग ताशी 185 किलोमीटर इतका नोंदवला गेला. गुजरात किनाऱ्यावर दीव ते महुवादरम्यान तोक्ते चक्रीवादळाचा लँडफॉल सुरु झाला. ज्यानंतर 12 तासांच्या कालावधीत चक्रीवादळाची तीव्रता ही टप्प्याटप्प्यानं कमी होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.