CM Thackeray vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून 'ब्रेक'
मुंबई : काँग्रेसनं स्वबळाचा सूर आवळला असला तरी राष्ट्रवादीनं शिवसेनेची हातमिळवणी कायम ठेवण्याचं जाहीर केलं आहे. मात्र त्याच राष्ट्रवादीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी झटका दिल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परळमधील टाटा रुग्णालयातील 100 कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु, या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानंतर टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्तांसाठी या म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्यांचं वाटपही करण्यात आलं होतं. मात्र या विरोधात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती. ज्या इमारतीमधील खोल्या कॅन्सरग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या, त्या इमारतीमधील रहिवाशांची तक्रार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे. मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली नाही आणि परस्पर या निर्णयाला स्थगिती दिल्यानं आता महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चर्चा न करता राष्ट्रवादीनं घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतमतांतरं आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लवकरच यासंदर्भातील खुलासा आणि एवढ्या मोठ्या निर्णयाला स्थगिती का देण्यात आली, याबाबतचं स्पष्टीकरण जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.