झीरो अवरमध्ये आज आपण पाहिलेल्या चार घटना असोत किंवा देशभरात होणारे असे इतर स्त्रीविरोधी अपराध...यात गुन्हेगारी वृत्ती आहेच पण पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. स्त्री ही फक्त उपभोग्य वस्तू आहे.. कमोडिटी आहे.. आपला तिच्यावर अधिकार आहे.. तिच्या नकाराला काही अर्थ नाही.. इनफॅक्ट तिला नकार देण्याचा अधिकारच नाही.. असे विचार कधी बुरसटलेल्या विचारसरणीतून, कधी चित्रपट, कधी टीव्ही मालिका, कधी जाहिराती अशा माध्यमातून कळत नकळत बिंबवले जातात.. अशा वातावरणात मुलं लहानाची मोठी होत असतात. ते त्यांच्या विचार-वृत्ती- प्रवृत्तीमध्ये झिरपले नाहीत तरच नवल. खऱ्या प्रेमाचा अर्थ.. प्रेमाचा खरा अर्थ आपल्याला कळला आहे का हा सुद्धा प्रश्नच आहे.. आपल्या आवडत्या व्यक्तीचा जीव घेणारं प्रेम खरं असू शकतं का? आत्ताची पिढी आकर्षण आणि खरं प्रेम यात गल्लत करत आहे का असेही प्रश्न आहेत.. त्यात अशा नाजूक गोष्टी.. भाव-भावना कुटुंबातील वडीलधाऱ्यांजवळ बोलण्यात अनेक मर्यादा.. कधी जातधर्मामुळे कधी इतर कारणांमुळे त्या अव्यक्तच राहतात.. त्यात नकार स्वीकारणे किंवा नकार पचवणे या गोष्टी आपल्याला नीट शिकवल्या जात नाहीत.. त्यामुळे प्रेमाचं रुपांतर कधी गुन्हेगारी मानसिकतेत होतं हे कळतच नाही.. खरं तर आपल्याकडे स्त्रियांना देवीचा दर्जा दिला आहे.. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः अर्थात जिथे स्त्रियांची पुजा होते तिथे देवता रमतात हे सांगणारी आपली संस्कृती.. तिचा विसर पडू दिला नाही तरी स्त्रीविरोधी गुन्हे कमी होण्यास मदत होईल.