Vaccine For Woman : गर्भवतींनी लस घ्यावी का? मासिक पाळीवेळी लस घ्यायची का? व्हायरल मेसेजचं सत्य काय?
देशात कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम सुरु आहे. आतातर 1 मे पासून 18 वर्षावरील सगळ्यांना लसीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही समाजात लसीकरणाबाबत काही अफवा पसरत आहेत. यात एक अफवा आहे महिलांची मासिक पाळी आणि लसीकरणाबाबतची. मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि मासिक पाळीच्या पाच दिवसनंतर महिलांनी लसीकरण करू नये अशा प्रकारचा संदेश सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे. याबाबत कुठलाही गैरसमज महिलांनी करून घेऊ नये. लसीकरणाचा आणि मासिक पाळीचा कुठलाही संबंध नसून महिलांनी आपल्याला मिळालेल्या तारखेला लसीकरण करून घ्यावे व कोरोनापासून बचाव करावा असे आवाहन धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी केले आहे.