WEB EXCLUSIVE : महाराष्ट्र सरकार ब्राझिलियन गीर वळू आयात करणार : पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
मूळच्या भारतीय मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ब्राझीलमध्ये संशोधन होऊन तिथे दुग्धोत्पादन क्षमता प्रचंड वाढलेल्या "ब्राझिलियन गीर गायी"चे वळू महाराष्ट्रात आणण्याचे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुग्धोत्पादन वाढवण्याचे राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाने ठरविले आहे. या योजनेअंतर्गत ब्राझिलियन गीर गायीचे काही वळू महाराष्ट्रात आयात केले जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. गीर गाय मूळची भारतातील गुजरातमधील असून भारतीय हवामानात ती सर्वोत्तम प्रजाती मानली जाते. मात्र, भारतामधील गीर गाईची वार्षिक दूध उत्पादन क्षमता चार ते पाच हजार लिटर एवढीच आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी भारतातून गीर प्रजातीच्या काही गाय ब्राझीलमध्ये नेऊन त्यांच्यावर संशोधन करून ब्राझील या देशाने त्यांची दूध उत्पादनक्षमता 10 ते 12 हजार लिटर प्रति वर्ष एवढी वाढवली आहे. ब्राझीलच्या या संशोधनाचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हावा. ब्राझिलियन गीर गायीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दुग्धोत्पादन क्षमता वाढावी. या उद्दिष्टाने ब्राझिलियन गीर प्रजातीचे काही वळू महाराष्ट्रात आयात केले जाणार आहे. महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाच्या नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत या आयात केलेल्या ब्राझीलियन गीर वळूवर आवश्यक संशोधन केले जाणार आहे. शिवाय विभागाने ब्राझिलियन गीर वळू चे गोठवलेले वीर्य ही मोठ्या प्रमाणात राज्यात आणून त्याचा वापर स्थानिक गाईंवर कृत्रिम रेतन पद्धतीसाठी करून त्यांची दुग्धोत्पादन क्षमता वाढवण्याचे ही ठरवलंय. कृत्रिम रेतनाची ही प्रक्रिया राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविली जाणार असून स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असा दावा केदार यांनी केला आहे. दरम्यान गीर ही मूळ भारतातील प्रजाती असून त्याचा असा वापर यापूर्वी का करण्यात आला नाही, यावर आपण भाष्य करणार नाही. मात्र यापुढे गीर या प्रजातीचा महाराष्ट्रातील दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होईल असा दावा केदार यांनी केला आहे.