Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, शाळांना सुट्टी, नद्यांना पूर

गेल्या काही दिवसांत राज्यभरात पावसानं उसंत घेतली असली तरी विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम आहे. भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने दोन दिवसांसाठी Orange Alert दिला आहे. मुसळधार पावसामुळे शाळांना मंगळवार आणि बुधवार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्याखाली गेले असून, पस्तीस पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून, गोसेखुर्द धरणामध्ये जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढल्याने तेथील तेहेतीस दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामधून जवळपास साडेचार लाखपेक्षा अधिक क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता भंडारा जिल्हा प्रशासन Alert Mode वर आहे. नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर दिसून आला. गोंदियातही मुसळधार पावसाचा जोर कायम असून, पुजारी टोला धरण Over Flow झाल्यानं धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात प्रचंड वाढ झाली असून, धापेवाडा Barrage येथील संपूर्ण दरवाजे सुरू आहेत. गडचिरोलीमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुरखेडा, देसाईगंज, कोरची, धानोरा आणि आरमोरी या पाचही तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. वर्ध्यात पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून, जिल्ह्यातील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. यवतमाळमध्ये काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola