Special Report Vidarbha Floods : विदर्भात पूरस्थिती, शाळांना सुट्टी, NDRF बचावकार्य
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपुरात पिवळी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. नागपूरच्या बेसा भागातील एक शाळा पाण्याखाली गेली होती. वाहतूक पोलिसांच्या चौकीतही पाणी शिरले होते. भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने उद्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक ११४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया आणि वर्ध्यातही पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वर्ध्यातील चांदकी येथे यशोधा नदीच्या पुरात अडकलेल्या बांधकाम मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरू झाल्याने आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहे. विदर्भातील या पूरस्थितीवर विधानसभेत माहिती देण्यात आली. “एक माणूस आत्तापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्या आपल्याला इन्फर्मेशन मिळाली आहे,” असे सांगण्यात आले. ४२ परिवार पुरात अडकले होते, त्यांचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम्स तैनात आहेत. नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.