Cyclone Taukta : कोकणात वेगाने मदतकार्य करा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Continues below advertisement

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने आज मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत थैमान घातले. यात झालेल्या नुकसानीचा आणि निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

या वादळामुळे एकूण 6 मृत्यू झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. एकूण 12 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली. 

कालपासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता. संध्याकाळनंतर तोक्ते चक्रीवादळ किनाऱ्यालागत येऊ लागले तसतसे विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागात जोरदार पाउस, वादळी वारे वाहू लागले तसेच मुंबईत देखील त्याचा परिणाम जाणवू लागला होता. पहाटेपासून तर मुंबईत दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरातही जोरदार वारे तसेच मुसळधार पाउस सुरु झाला. मुंबई महानगरपालिकेने आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर लक्ष ठेवले होते तसेच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram