Uddhav-Shinde Photo Session : विधीमंडळात 'फोटोसेशन'चा राजकीय थरार!
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचे निमित्त होते. विधीमंडळात फोटोसेशनसाठी विधान परिषदेचे आमदार जमले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी पहिल्या रांगेत स्थानापन्न झाली. वक्तशीर अजित पवार सर्वात आधी पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, नीलम गोऱ्हे आणि अंबादास दानवे आले. फडणवीसांच्या आग्रहाखातर अंबादास दानवे एकनाथ शिंदेंच्या खुर्चीवर बसले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आल्यावर अंबादास दानवेंनी खुर्ची मोकळी केली. उशिरा आलेल्या एकनाथ शिंदेंनी राम शिंदेंच्या बाजूची खुर्ची पकडली. फोटो क्लिक झाला, पण तेवढ्यात उद्धव ठाकरेंची एंट्री झाली. अनपेक्षित धक्क्याने सगळे मान्यवर उभे राहिले. उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी कुणाच्या बाजूची खुर्ची द्यायची हा प्रश्न होता. उद्धव ठाकरे पुढे सरकत असताना एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर अवघडलेपण स्पष्ट जाणवत होते. फडणवीसांनी ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. पण "ठाकरे शिंदेंना एकमेकांच्या शेजारी बसणं मात्र नको होतं." ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंच्या शेजारच्या खुर्चीवर बसणे पसंत केले. मध्यभागी नीलम गोऱ्हे, त्यांच्या एका बाजूला ठाकरे आणि एका बाजूला शिंदे असा फोटो क्लिक झाला. फोटोसेशननंतर उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांच्यात संवाद झाला. दुसरीकडे, एकनाथ शिंदे, अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकरांमध्येही गप्पा रंगल्या. एकाच फोटोसेशनचे अनेक राजकीय पदर होते.