Thackeray Reunion | ठाकरे बंधू एकत्र, पण युती होणार का? सस्पेन्स कायम!
पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. या दिवशी दोन्ही पक्षाच्या सैनिकांनी मोठा उत्सव साजरा केला. 'मराठी हाच अजेंडा' या भूमिकेवर राज ठाकरे ठाम होते. तर एकत्र राहण्याची भाषा फक्त उद्धव ठाकरेंच्या तोंडी होती. 'एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी' असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. मात्र, राज ठाकरेंनी अजूनही युतीबद्दलचे पत्ते उघड केलेले नाहीत. त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युती संदर्भात न बोलण्याचा आदेश दिला आहे. 'ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युती संदर्भात कुणीही बोलू नये. कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारावं,' असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरे बंधू महापालिका एकत्र लढवणार का, हा सस्पेन्स कायम आहे. खासदार संजय राऊत यांनी मात्र राज आणि उद्धव हे चुलत बंधू एकत्र राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. पाच तारखेला मराठीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर राज ठाकरे आणि मनसेची छाप होती. राज ठाकरेंनी सर्व पत्ते उघड न केल्याने ते उद्धव ठाकरेंसोबत जाणार की नाही, हा संभ्रम कायम आहे. सध्याच्या स्थितीत एकत्र राहण्यात उद्धव ठाकरेंचा जास्त फायदा दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत आहेत.