वर्षभरापासून काम करणाऱ्या राज्यातील शिक्षकांना 1 मे पासून सुट्टी जाहीर करा; शिक्षक संघटनांची मागणी

Continues below advertisement

मुंबई : मागील वर्षभरापासून ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांना शैक्षणिक वर्ष संपले तरीसुद्धा शिक्षकांना सुट्ट्या जाहीर न केल्याने उन्हाळी सुट्टी 1 मे पासून जाहीर करावी, अशी मागणी शिक्षकांकडून जोर धरू लागली आहे. इयत्ता 1ली ते 9वी वर्गाला शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर तरी सुट्ट्या जाहीर कराव्यात आणि शिक्षकांना ऑनलाईन कामातून विश्रांती द्यावी, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. 

विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेऊन देखील शैक्षणिक वर्ष समाप्त झाल्याची घोषणा शिक्षण विभागाने केली नाही. शिवाय अनेक शिक्षक अजूनही ऑनलाईन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत. आणखी किती दिवस शिक्षकांनी हे वर्ग सुरु ठेवावे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 'मागील वर्षापासून कोरोनाच्या संकटात राज्यातील शिक्षकांनी वर्षभर अनेक अडचणीन तोंड देत ऑनलाईन शिकवून अभ्यासक्रम पूर्ण केला. शिवाय, काही शिक्षकांना शासनाने सरकारी कामासाठी सुद्धा बोलवून काम करून घेतले. असं असताना विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम झाल्यानंतर 1 मे पासून सुट्टी जाहीर करावी', अशी मागणी भाजप शिक्षक आघाडी संघटनेचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. 

'देशातील इतर राज्यात ज्यामध्ये राजस्थान, हरियाणा, पंजाब, तसेच दिल्ली येथे उन्हाळी सुट्टी जाहीर केली असताना राज्यातील शिक्षण विभाग परीक्षेबाबत निर्णय झाल्यानंतर सुद्धा का घेत नाही ?' असा प्रश्न महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या शिवनाथ दराडे यांनी शिक्षण विभागाला विचारून चार वेळेस मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या सुट्टीच्या मागणीकडे पाहून शिक्षण विभाग नेमका काय निर्णय घेणार? हे पाहावे लागणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram