Tadoba Tourist Accident : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या जिप्सीचा अपघात, 2 पर्यटक किरकोळ जखमी
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील देवाडा-आगरझरी परिसरात पर्यटकांच्या एका जिप्सीचा अपघात झालाय. अपघातात चंद्रपूर शहरातील २ पर्यटक किरकोळ जखमी झाले असून राजू चौधरी आणि मनीषा मंडल अशी अपघातात जखमी झालेल्या पर्यटकांची नावं आहेत. प्राथमिक उपचारानंतर पर्यटकांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला असून निर्धारित वेग मर्यादा ओलांडून वाघ पाहण्याच्या घाईत ही जिप्सी एका झाडावर आदळल्याचं सांगितल्या जात आहे. ताडोबा प्रशासनाकडून या प्रकरणात ३ महिन्यांसाठी जिप्सी चा परवाना रद्द करण्यात आलाय तर जिप्सी चालक सूरज ढोक वर ३ महिन्यांची आणि गाईड अर्जुन कुमरे वर एक महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच रविवारी नागपूर जिल्ह्यातील करांडला वन्यजीव अभयारण्यात देखील अशाच प्रकारे एका जिप्सीचा अपघात झाला होता. सफारी दरम्यान समोर वाघीण आल्यानंतर चालकाने जिप्सी मागे घेण्याचे प्रयत्न केला आणि उतारावरून जिप्सी पलटी झाली. या घटनेत पर्यटक जखमी झाले नाही मात्र जिप्सीचा चालक आणि गाईड किरकोळ जखमी झाले.