Sunetra Pawar Full Speech : सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच दिले लोकसभा लढवण्याचे संकेत, म्हणाल्या...
बारामती: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. या मतदारसंघातून मविआच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात महायुतीकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना रिंगणात उतरवले जाईल, अशी चर्चा आहे. महायुतीकडून अद्याप सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये सुनेत्रा पवार बारामतीमध्ये (Baramati Loksabha) जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची लोकसभा उमेदवारी जाहीर होणे, ही निव्वळ औपचारिकता मानली जात आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला अजित पवार यांना बारामतीमधील आपल्या विरोधकांना शांत करण्यात अद्याप यश आलेले नाही. शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी नुकतेच अजित पवार यांच्याविरोधात उघडपणे दंड थोपटले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती जिंकणे तितकेसे सोपे नसेल, हे स्पष्ट झाले आहे. अशातच मंगळवारी सुनेत्रा पवार यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य पाहता सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्याविषयी नक्की काय विचार करत आहेत, याबाबत नवी शंका उपस्थित झाली आहे.