Sunetra Pawar RSS Meeting | सुनेत्रा पवार राष्ट्रसेविका समिती बैठकीत, राजकीय चर्चांना उधाण
खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावली. विशेष म्हणजे महायुतीमध्ये असूनही अजित पवार कधीही संघाच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी मात्र राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी महायुतीच्या आमदारांना हेगडेवार स्मारक येथे बौद्धिकाचे आमंत्रण असते, पण तिथे अजित पवार आणि त्यांचे आमदार जात नाहीत. त्याचप्रमाणे दिल्लीतही अधिवेशनावेळी संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या बैठकीला अजित पवारांच्या पत्नी उपस्थित राहिल्या. भाजप खासदार कंगना रनौत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही राष्ट्रसेविका समितीची शाखा भरली होती. या शाखेमध्ये सर्व महिला खासदारांनी हजेरी लावली होती आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार देखील होत्या. सुनेत्रा पवारांच्या हाती माईक होता. कंगना रनौत यांच्या घरी भरवलेल्या या शाखेमध्ये सतीश वेलणकर, जे भारतीय जनता पक्षाचे सहसंघटन मंत्री आहेत, ते स्वतः हजर होते. या ठिकाणी समिती संदर्भात आणि संघासंदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली. संघ परिवारापासून दूर असण्याचा दावा करणारे अनेक राजकीय घटक संघाच्या विविध बैठका किंवा शाखांना हजेरी लावत आहेत, हे यातून दिसून येते.