Rohit Pawar ED | राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार आज कोर्टात येणार
आमदार रोहित पवार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी विशेष पीएमएलए कोर्टात सकाळी अकरा वाजता हजर राहणार आहेत. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत कोर्टाने त्यांना समन्स बजावले आहे. रोहित पवार यांच्यासह त्यांचे व्यावसायिक भागीदार राजेंद्र इंगोले यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. जून महिन्यात रोहित पवार, इंगोले आणि बारामती अॅग्रो विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी दोन वेळा रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी झाली आहे. "खंडाळ सहकारी साखर कारखान्याच्या फसव्या संपादन प्रक्रियेत रोहित पवार सहभागी असल्याचं सक्रियदर्शिनी निष्पन्न होतंय" असे आरोपपत्रात न्यायालयाचे निरीक्षण आहे. खंडाळ सहकारी साखर कारखान्याच्या ८० कोटींच्या थकीत कर्ज वसुलीसाठी १३ जुलै २००९ रोजी मालमत्ता शिखर बँकेने ताब्यात घेतल्या होत्या. लिलावात सर्वाधिक बोली लावणारे तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरवून रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडला कारखाना देण्यात आला. या प्रकरणी ईडीने रोहित पवारांना दोषी धरले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्यावर ईडीने ईसीआयआर दाखल केला होता.