Amravati Violence : अमरावतीमधील हिंसेच्या मुळाशी जाऊन कारवाई करू : गृहराज्यमंत्री Shambhuraje Desai
Maharashtra Tripura violence Update : त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले आहेत. मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी येथे मुस्लिम समाजानं मोर्चे काढले. ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. मोर्चादरम्यान मालेगाव, नांदेड, अमरावतीत झालेली तोडफोड कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. राज्यात काही ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे.
त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. नांदेड शहरात काल मुस्लिम समाजानं काढलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागलं. शहरातल्या शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत.
त्रिपुरातील कथीत हिंसाचाराचा निषेधार्थ काल यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या वेळी एका युवकाला मारहाण करण्यात आली. तसंच आंदोलकांकडून एका दुकानातही मारहाणीची घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
दरम्यान मालेगावातही त्रिपुरातल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजानं बंद पाळला होता. या बंदलाही गालबोट लागलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठा जनसमुदाय निघाला होता. यावेळी काही ठिकाणी जमावानं दगडफेक केली.
भिवंडीतही काल मुस्लिम समाजानं बंद पुकारला होता. मात्र शहरातील प्रभुआळी मंडई, बाजारपेठ या भागात दुकान बंद न झाल्याने एका मोटारसायकलवर आलेल्या टोळीने व्यापाऱ्यांची जबरदस्ती दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे व्यापाऱ्यांनी विरोध करून पोलिसांना माहिती देताच या टोळीने घटनास्थळावरून पळ काढला.
त्रिपुरातील कथित घटनांचं भांडवल करुन अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये निघालेले मोर्चे आणि त्यातून झालेली दगडफेक चिंताजनक आहे. राज्य सरकारनं त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणावी असं ट्वीट देवेंद्र फडणीसांनी केलं आहे. दरम्यान त्रिपुरात झालेल्या घटनेचा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी निषेध केलाय. महाराष्ट्रात झालेल्या दगडफेकीच्या घटनेचाही निषेध करत असल्याचं खासदार जलील यांनी म्हटलंय..मालेगावमध्ये पोलीस परवानगी नसताना काल मोर्चा काढण्यात आला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. हिंदुना घाबरवलं जात आहे. तरीही महाराष्ट्र सरकार गप्प का असं ट्वीट नितेश राणेंनी केलंय.