ST कर्मचाऱ्यांच्या अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव, सरकारच्या पर्यायावर शिष्टमंडळ चर्चा करणार
राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता लवकरच मिटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत राज्य सरकारच्या वतीनं कर्मचाऱ्यांना नवा पर्याय देण्यात आला आहे. राज्य सरकारकडून अंतरिम वेतनवाढीचा एक प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला. यासंदर्भात उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होणार आहे. हा प्रस्ताव मान्य करून कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. एसटीचं शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. याबाबत हायकोर्टाच्या आदेशाने समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढचा निर्णय घेता येणार आहे. ही बाब निदर्शनास आणून देत परब यांनी अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवला.