ISRO Spadex Mission :इस्रोकडून स्पेडेक्स मिशनचं लाँचिंग,डॉकिंग-अनडॉकिंग क्षमतेत भारत होणार स्वावलंबी

Continues below advertisement

ISRO Spadex Mission :इस्रोकडून स्पेडेक्स मिशनचं लाँचिंग,डॉकिंग-अनडॉकिंग क्षमतेत भारत होणार स्वावलंबी

स्पेस डॉकिंग एक्सप्रिमेंट (स्पेडेक्स) या अवकाशात दोन उपग्रहांना जोडणाऱ्या मोहिमेचे आज रात्री नऊ वाजून ५८ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था, म्हणजेच इस्रोतर्फे चांद्रयान ४ आणि भारतीय अवकाश स्थानकाची पूर्वतयारी म्हणून स्पेडेक्स हा प्रयोग केला जाणार आहे.   हा प्रयोग यशस्वी झाल्यास अवकाशात दोन भागांची जोडणी करण्याची (डॉकिंग) क्षमता असलेला भारत चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांना डॉकिंगचे तंत्र अवगत आहे.  ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक म्हणजेच पीएसएलव्ही सी ६० च्या साह्याने प्रत्येकी २२० किलो वजनाच्या एसडीक्स०१ आणि एसडीक्स०२ या दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येईल. जमिनीपासून ४७० किमी उंचीवरील वर्तुळाकार कक्षेत दोन्ही उपग्रहांना लहानशा गती फरकाने मुक्त केले जाईल.  साधारणपणे २४ तासांमध्ये दोन्ही उपग्रहांमधील अंतर १० ते २० किलोमीटर इतके होईल. उपग्रहांवरील इंजिनाच्या साह्याने दोन्ही उपग्रहांना एका समान कक्षेत आणून त्यांचा वेगही समान केला जाईल. दोन उपग्रहांमधील अंतर २० किलोमीटर असताना प्रयोगाची सुरुवात होईल.   एसडीक्स०२ या लक्ष्य उपग्रहाच्या दिशेने एसडीक्स०१ हा उपग्रह पाठलाग सुरू करेल. पाच किलोमीटर, दीड किलोमीटर, ५०० मीटर, २२५ मीटर, १५ मीटर, तीन मीटर असे टप्प्या- टप्प्याने दोन्ही उपग्रहांमधील अंतर कमी होत जाईल. उपग्रह जोडणीची प्रक्रिया अत्यंत अलगदपणे व्हावी यासाठी एसडीक्स०१ उपग्रहाचा अखेरचा वेग १० मिलीमीटर प्रतिसेकंद इतका ठेवण्यात येईल.      उपग्रहांचे डॉकिंग अचूकतेने घडावे यासाठी लेझरचा समावेश असलेले पाच वेगवेगळे सेन्सर वापरण्यात येणार असून, उपग्रहांच्या कक्षेतील स्थान निश्चितीसाठी जीएनएसएस उपग्रहांची मदत घेतली जाईल. उपग्रहांचे डॉकिंग पूर्ण झाल्यानंतर एका उपग्रहाकडून दुसऱ्या उपग्रहाकडे वीज प्रवाह सक्रिय करण्याचाही प्रयोग करण्यात येईल. दोन्ही उपग्रहांना काही काळाने विलगही करण्यात (अनडॉकिंग) येईल.   एसडीक्स०१ उपग्रहावर हाय रिझोल्युशन कॅमेरा; तर एसडीक्स०२ उपग्रहावर मिनिएचर मल्टी स्पेक्ट्रल पेलोड आणि रेडिएशन मॉनिटर पेलोड ही तीन वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. पुढील दोन वर्षे ही उपकरणे ४५० किलोमीटर उंचीवरून शास्त्रीय नोंदी घेण्याचे काम करतील.   आगामी मोहिमांसाठी अत्यावश्यक प्रयोग   दोन उपग्रहांना अवकाशात जोडणे आणि विलग करण्याचे तंत्रज्ञान भारताच्या आगामी मोहिमांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. चांद्रयान ४ मोहिमेतून चंद्रावरील दगड, मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या यानांना अवकाशात जोडून पुन्हा विलग करण्याची प्रक्रिया साधावी लागणार आहे.   २०२८ ते २०३५ या कालावधीमध्ये भारतीय अंतरिक्ष स्टेशनची निर्मितीही टप्प्या टप्प्याने डॉकिंगद्वारे केली जाणार असून, भारतीय यानांनी अवकाश स्थानकाला भेट देण्यासाठीही ही प्रक्रिया अत्यावश्यक असेल.   २०४० मध्ये चांद्रभूमीवर भारतीय नागरिक पाठवतानाही डॉकिंगचा वापर केला जाईल. या तंत्रज्ञानाची पहिली चाचणी स्पेडेक्स मोहिमेतून घेतली जाईल.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram