पत्नीवर संशय, भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्यांवर SRPF जवानाचा गोळीबार, एकाचा मृत्यू, बार्शीतील घटना
सोलापूर : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन एसआरपीएफ जवानाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे गावात काल रात्री पावणे अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीच्या जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी असल्याची माहिती देखील मिळते आहे.
नितीन बाबुराव भोसकर असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी जवान गोरोबा तुकाराम महात्मे यास पोलिसांनी अटक केलीय. गुन्ह्यात वापरण्यात आलेले एक सरकारी पिस्टल आणि 26 जिवंत काडतूस देखील पोलिसांनी केली जप्त केली आहेत.
एसआरपीएफ जवान गोरोबा महात्मे हे सध्या मुंबईत एका ज्येष्ठ सरकारी वकिलांचे सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावत आहे. काही दिवसांपासून त्यांचे आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडणं सुरू होती. महात्मे यांना आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पती-पत्नीतील हा वाद संपवण्यासाठी सासरकडील मंडळी काल गोरोबा महात्मे यांच्या घरी गेली होती. मात्र याच वेळी गोरोबा महात्मे यांना संताप अनावर झाला आणि संतापाच्या भरात त्यांनी भांडणं मिटवण्यासाठी आलेल्या व्यक्तींवर आपल्या सरकारी पिस्टलमधून चार राउंड फायर केले. यामध्ये त्यांच्या मेहुण्याचे मित्र नितीन भोसकर यांचा गोळी लागून जागीच मृत्यू झाला आहे. तर बालाजी महात्मे हे या गोळीबारमध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.