Sindhudurg Lockdown : सिंधुदुर्गात 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन, पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घोषित केला आहे. या काळात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा, बेकरी, भाजीपाला, दूध व्यावसायिकांनी होम डिलिव्हरी करायची मुभा देण्यात आली आहे. मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद राहतील. त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिनांक 9 मे रात्री 12 ते 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे.
या काळात सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने ( कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह) पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्यांच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापी सदर दुकानांची घरपोच सेवा ( Home Delivery) सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीतच चालू ठेवणेस परवाणगी राहील.
आंबा वाहतूकीस परवानगी राहील मात्र वाहतुकीदरम्यान कोव्हिड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. कृषि अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकानांची सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील. हॉटेल, रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते दुपारी २ व सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्त भाव दुकाने सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी असेल. लसीकरणाकरता प्रवास करणाऱ्या व्यक्तींना व माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत काम करणाऱ्यांना यामधऊन सूट देण्यात येत आहे.