Babasaheb Purandare : शिवरायांचा दरबार महाराष्ट्राला दाखवणाऱ्या बाबासाहेबांना मुजरा : Vishwas Patil

Continues below advertisement

Shivshahir Babasaheb Purandare passed away : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.  बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1764 ’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.

महाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram