Shirdi Sai Baba Coins Dispute | शिर्डीत साईबाबांच्या नाण्यांवरून नवा वाद, संख्या २२ वर!
शिर्डीमध्ये साईबाबांनी महानिर्वाणाच्या वेळी लक्ष्मीबाई शिंदेंना भेट दिलेल्या नऊ नाण्यांवरून नवा वाद सुरू झाला आहे. साई चरित्रात या नाण्यांचा उल्लेख आहे, मात्र त्यांच्या खरेपणावरून शिर्डीत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. सध्या या नाण्यांची संख्या नऊवरून तब्बल बावीसवर पोहोचली आहे. यामध्ये शिंदे कुटुंबाकडे नऊ, साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अरुण गायकवाड यांच्याकडे नऊ आणि आणखी एका शिंदे गटाकडे चार नाणी आहेत. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांनी त्यांच्याकडील नाणी खरी असल्याचा दावा केला आहे, तर अरुण गायकवाड यांनीही त्यांच्याकडील नऊ नाणी खरी असल्याचं म्हटलं आहे. या नाण्यांची सत्यता पुरातत्व विभागाकडून तपासण्याची मागणी शिंदे कुटुंबियांनी केली आहे. अरुण गायकवाड यांच्याकडील नाणी खोटी असल्याचा आरोप करत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र तक्रारदार अनुपस्थित राहिल्याने गायकवाड कुटुंबियांना दिलासा मिळाला. यानंतर अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन "ज्यांना शंका आहे त्यांनी साईबाबांचा डीएनए दाखवावा" असे वक्तव्य केले. या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिर्डीतील ग्रामस्थ आक्रमक झाले, त्यामुळे अरुण गायकवाड यांनी माफी मागितली. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांचा दावा आहे की, त्यांची नऊ नाणीच खरी आहेत आणि ती शंभर वर्षांपासून घरातच आहेत. संजय शिंदे यांनी धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचे सांगितले.