Sharad Pawar PC : ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारावर गदा ; शरद पवार
मुंबई : गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने कधी नव्हे ते ईडीच्या इतक्या कारवाया अनुभवल्या. प्रत्येक खात्यातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी त्या-त्या संबंधित संस्था असतानाही ईडी प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देते. ईडीच्या या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली. शरद पवार म्हणाले की, "गेल्या दोन तीन वर्षात देशातील लोकांना ईडी या संस्थेच्या नावाची माहिती झाली. आता ही ईडी कुणाच्या मागे कशी लावली जाईल हे सांगता येत नाही. राज्यात ज्या ठिकाणी गैरव्यवहार झाले त्याची चौकशी करण्याचे अधिकार हे राज्यांकडे आहेत. पण अशा प्रकरणात ईडीचा हस्तक्षेप वाढत असून त्यामुळे राज्यांच्या अधिकारावर गदा येत आहे आणि लोकशाहीमध्ये ही गोष्ट चुकीची आहे." केंद्रातील भाजप सरकारने ईडीचा राजकीय साधन म्हणून वापर सुरु केल्याचा आरोपही शरद पवारांनी केला आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळींना ईडीकडून विनाकारण त्रास देण्यात येत असून ही गोष्ट चुकीची आहे असंही ते म्हणाले. अनिल देशमुखांच्या प्रकरणी कायदेशीर लढाई सुरु असून त्यावर आपण भाष्य करणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं.