Scotland : महाराष्ट्राला अंडर टू कोअॅलिशनचा पुरस्कार, पर्यावरणपूरक कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचा गौरव
अंडर टू कोअॅलिशनच्या या जागतिक संस्थेच्या पहिल्या लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राला प्रेरणादायी विभागीय नेतृत्व पुरस्कारानं गौरवण्यात आलं. स्कॉटलंडमधल्या ग्लासगो येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीच हा पुरस्कार स्वीकारला. आदित्य ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं पर्यावरणविषयक कार्यक्रमांसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
जगातली अनेक राष्ट्रं आणि विविध देशांमधल्या राज्यांनी एकत्र येऊन अंडर टू कोअॅलिशन या संस्थेची उभारणी केली आहे. ही संस्था प्रामुख्यानं पर्यावरणपूरक कार्यक्रमांसाठी कटिबद्ध आहे. वातावरणीय बदलांच्या आव्हानांवर उपाययोजना शोधण्यासाठी महाराष्ट्रानं माझी वसुंधरा ही देशातली पहिली राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. याच प्रयत्नांसाठी महाराष्ट्राला गौरवण्यात आलं. अंडर टू कोअॅलिशनच्या सोहळ्यात लीडरशिप पुरस्काराचा मान मिळवणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरलं.