Schools Reopen In Maharashtra | नाशिक, पुणे, औरंगाबादमधील 9 ते 12 वीचे वर्ग आजपासून सुरु
Schools Reopen In Maharashtra : आजपासून नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि पालघरमधील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर आजपासून पुणे, नाशिक, औरंगाबाद, पालघरमध्ये शाळा सुरु होत आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा मात्र 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला होता. मात्र कोरोनास्थिती पाहून महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा राज्य सरकारनं दिली होती. त्यानुसार आज नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि पालघर जिल्ह्यातील शाळा सुरु होत आहेत. कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला आहे. तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थी आणि कमर्चाऱ्यांचं थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर तपासणी यांसारख्या सुरक्षा उपायांचे पालन करणंही गरजेचं असणार आहे. त्याचसोबत शाळाव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनाही आरटी-पीसीआर टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी कोरोनाचे नियम पाळण बंधनकारक असणार आहे.