Satara Bagad Yatra : साताऱ्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बगाड यात्रेला सुरूवात
Maharashtra Satara Bagad Yatra : महाराष्ट्रातील सर्वात मोठं 'बगाड' म्हणून बावधनचं बगाड फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यानं बगाड यात्रा (Bagad Yatra) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. पण या बगाड यात्रेची परंपरा काय? ती का साजरी केली जाते? हे जाणून घेऊयात...
सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावं. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि याच गावाची यात्रा म्हणजे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी समजली जाणारी यात्रा. सुमारे चार लाखांपेक्षा जास्त लोक या यात्रेत सहभागी झालेले असतात आणि या बगाडातील एक खास वैशिष्ट्य मानलं जातं म्हणजे, या बगाडाला जुंपली जाणारी शेकडो धष्ट पुष्ट खिलार जातींची बैल. या उत्सवाला सुरवात होते ती नव्याच्या पौर्णिमेपासून. बगाडाच्या शिडाचे कळक तोडले जातात. हे कळक तोडण्यासाठी आख्खं गाव जमा होतं. कळकांच्या बेटाजवळ गेल्यानंतर सर्वात मोठं कळक याठिकाणी शोधलं जातं आणि ते कापून वाजत गाजत गावात आणलं जातं. त्यानंतर गावाकरी आपला मोर्चा बाभळीच्या झाडाकडे वळवतात. लाकडातील चिवट लाकूड म्हणून बाभळीच्या झाडाकडे पाहिलं जातं. या बगाडासाठी खास बाभळीची लाकडं तोडून तीही वाजत गाजत गावात आणली जातात. आणि ही बाभळीची लाकडं आणण्यासाठी गावातील एकोप्यातील जल्लोष पहायला मिळतो.