Satara ambeghar Landslide : अखेर आंबेघर गावात एनडीआरएफची टीम पोहोचली, बचावकार्य सुरु
Satara Rain Update : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर गावामध्ये एनडीआरएफची टीम काही वेळा पूर्वी पोहोचली आहे. आंबेघरमधे भुस्खलन होऊन 16 लोक कालपासून बेपत्ता आहेत. याठिकाणी पोहोचणं फार कठिण असल्यानं कालपासून कुणीही इथं पोहोचू शकलं नाही. आज सकाळपासून एन डी आर एफ ची टीम आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुन्हा बोटींच्या सहाय्याने आंबेघरमधे जाण्याचा प्रयत्न केला. अखेर दुपारच्या सुमारास एनडीआरएफसह सरकारी अधिकाऱ्यांची टीम आंबेघरमध्ये पोहोचली. सध्या बचावकार्य वेगाने सुरु आहे.
आंबेघरमध्ये बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. इथं जेसीबी, पोकलेन अशी वाहनं पोहोचू शकलेली नाहीत त्यामुळं एनडीआरएफला हातानेच मदतकार्य करावं लागत आहे. काही लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे.
कराडमधील प्रिती संगमावरील यशवंतराव चव्हाणांचे स्मृतीस्थळाला अजूनही पाण्याचा वेढा आहे. आता स्मृतीस्थळ पूर्णपणे पाण्यात गेलं आहे. पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंदच आहे. पावसाने मध्यरात्रीनंतर काहीशी उघडीप दिली होती. मात्र पहाटेपासुन पुन्हा पाऊस सुरु झालाय. कोयना धरणातून 53 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून कालपासून त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही.