Santbhet | माऊली-तुकोबा भेट १७ वर्षांनी, आळंदीत जंगी स्वागत!
संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठागमन सोहळा या निमित्ताने तुकाराम महाराजांची पालखी आज आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी येणार आहे. रात्री आठच्या सुमारास संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या भेटीचा सोहळा संपन्न होईल. यानंतर तुकोबारायांचा पालखी सोहळा माऊलींच्या मंदिरातील कारंजा मंडपात मुक्काम करणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आणण्यासाठी आळंदी देवस्थानने देहू देवस्थानाला पत्राद्वारे निमंत्रण दिले होते. देहू देवस्थानने आळंदीकरांचे हे निमंत्रण स्वीकारले आणि पालखी सोहळा आळंदीत आणण्याची तयारी दर्शवली. तब्बल सतरा वर्षांनंतर तुकोबाराय माऊलींच्या भेटीला येत असल्याने आळंदीत दोन्ही सोहळ्यांचे जंगी स्वागत केले जाईल. सोहळ्याचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.