Sanjay Raut : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाचं होईल ; संजय राऊत यांचे संकेत

Continues below advertisement

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाचं होईल, असे संकेत आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. आवाजी मतदानानं निवडणूकीची तरतूद राज्य घटनेत आहे, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत अधिवेशनाबाबत रणनिती ठरली असू शकते, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानानं व्हावी याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "राज्यात सरकारची स्थापना झाली त्यावेळी 170चं बहुमत आमच्याकडे होतं. पण दुर्दैवानं आमचे दोन आमदार कमी झाले आहेत. तसेच पंढरपूर पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तरीही 170 चा आकडा कायम राहिल, याची आम्हाला खात्री आहे. पण हा सगळा घाट घालण्यापेक्षा जर आवाजी मतदान झालं, तर तिसुद्धा घटनात्मक तरतूद आहेच. अशाप्रकारच्या निवडणुका सर्वत्रच झाल्या आहेत"

महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील भेटी-गाठीच्या सत्रावरुन बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सर्वांना असं वाटतंय की, काहीतरी घडतंय, पण तंस काहीच नाही. तसेच भेटीतून वेगळे अर्थ काढावे असं काहीच मला होताना दिसत नाहीये. परवा शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक पार पडली, चर्चा झाली. विरोधी पक्षाकडून सध्या सत्ताधाऱ्यावर हल्ले सुरु आहेत. त्यातील अनेक हल्ले फुसके बार आहेत, हे आम्हालाही माहीत आहे. पण एकत्रितपणे त्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. जो भ्रम निर्माण केला जातोय, जे आरोप केले जात आहेत, सातत्यानं. त्याला त्याच ताकदीनं उत्तर देण्याची गरज आता मला वाटतेय. म्हणूनच आता मुंबईला गेल्यावर मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेटून याबाबत काय करता येईल, हे ठरवणार आहे."

संजय राऊत बोलताना म्हणाले की, "एकतर्फी हल्ले होत आहेत. खोटे हल्ले होत असून चुकीचे आरोप केले जात आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा वापर केला जातो. म्हणजेच, अनेक खोट्या आणि बनावट गोष्टी खऱ्या म्हणून समोर आणल्या जातात. गोबेल्सलाही लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात असे आरोप होत असतात, पण आरोप करताना काही मर्यादाही आपल्याला पाळाव्या लागतात. आणि त्यासाठी सरकारने रणनीती आखण्याची गरज आहे."

"महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या हातात आमच्याशी लढण्याचं एकमेव हत्यार म्हणजे, केंद्रीय तपास यंत्रणा. त्याशिवाय त्यांच्या हातात काहीच नाही. आरोप खोटे, बनावट असतील तर त्याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा मजबूत आणि निष्पक्ष आहे. केंद्रात भाजपाचं सरकार असल्याने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील मंत्री, आमदारांना त्रास देणं हीच एक ताकद त्यांच्या हातात आहे. कितीही खोटं करण्याचा प्रयत्न केला तरी उघड होतंच. असत्य तरंगून शेवटी वर येतं. या सर्वांशी लढण्यासाठी आता एक पाऊल पुढे टाकावं लागेल.", असं संजय राऊत म्हणाले. 

जर भाजपनं त्यावेळी शिवसेनेला दिलेला शब्द पाळला असता, तर कदाचित उद्धव ठाकरे यांना अशा प्रकारचा निर्णय घेण्याची वेळ नक्कीच आली नसती, असं म्हणत संजय राऊत यांनी युतीच्या काडीमोड झाल्याचं खापर पुन्हा एकदा भाजपवर फोडलं आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आता जे झालं त्याबाबत आम्हाला खेद वाटण्याचं कारण नाही. आता आम्ही तिघांनी मिळून एक मार्ग स्विकारला आहे. एक रचना तयार केली आहे. व्यवस्था स्विकारली आहे. ते पुढे नेणं हे आमचं तिघांची जबाबदारी आहे."

चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांना अजित पवारांच्या सीबीआय चौकशीसाठी लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचं डिक्टेशन चांगलं आहे पाहिलं मी. त्यांनी फआर चांगल्या प्रकारे पत्र ड्राफ्ट करतात. पण त्यात काही चुका आहेत. पत्रकार असल्यामुळे मला त्या चुका दिसतात. काय चुका आहेत, ते वेळ आल्यावर सांगू आम्ही. चंद्रकांत पाटील अत्यंत विद्वान आहेत. त्यांच्यासारखा विद्वान राजकारणी महाराष्ट्रात मी गेल्या काही दिवसांत पाहिलेला नाही. मी मागेही म्हटलं होतं की, ते निष्पाप आहेत, निरागस आहेत. लहान बालकासारखे आहेत ते. त्यामुळे त्यांच्या या गोष्टी सहजतेने घेतल्या पाहिजेत. विरोधी पक्षांनी आपलं काम करत राहावं, आम्ही आमचं काम करत राहू."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram