Sanjay Raut : Mehebuba Mufti यांनी फुटिरतावाद्यांना मदत केली, भाजपने त्यांना बळ देण्याचं काम केलं
Sanjay Raut On BJP : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आज पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी जम्मू काश्मिरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्याशी केलेल्या युतीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. कारण मेहबूबा मुफ्ती या भारतीय जनता पक्षाच्या मैत्रिण होत्या. मेहबूबा मुफ्ती यांचा राजकीय पक्ष आहे. तो पहिल्यापासून फुटीरतावाद्यांना मदत करणारा, पाकिस्तानला काश्मीरचा चर्चेत ओढणारा, अतिरेक्यांनी विषयी सहानुभूती दाखविणारा पक्ष होता. तरीही या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीने युती करून सत्ता उपभोगली, असं ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, त्याच काळात कश्मिरी पंडितांवर हल्ले झाले. त्याच काळात जे अतिरेकी लष्कराने मारले. त्या अतिरेक्यांना मेहबूबा मुफ्तींकडून स्वातंत्र्यसैनिक बनविण्याचा प्रयत्न झाला. तरी देखील भारतीय जनता पक्ष सरकारमधून बाहेर पडला नाही आणि आता कश्मीर फाईल्स बनवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. मेहबूबा मुफ्ती आणि त्यांच्या पक्षाला ताकत देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे, असं राऊत म्हणाले.