Samarjeet Ghatge Mahayuti : समरजीत घाटगे महायुती मेळाव्याला जाणार नाहीत !
Samarjeet Ghatge Mahayuti : समरजीत घाटगे महायुती मेळाव्याला जाणार नाहीत !
भाजपचे नेते समरजित घाटगे (Samarjit Ghatge) हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या (NCP Sharad Pawar Group) वाटेवर असल्याची चर्चा आहे. समरजित घाटगे हे 23 ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यातून ते मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समरजित घाटगे यांनी पक्ष सोडू नये यासाठी भाजपकडून (BJP) जोरदार हालचाली सुरु आहेत. बुधवारी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी समरजित घाटगे यांच्या घरी त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर समरजित घाटगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कागल विधानसभा मतदारसंघात (Kagal Vidhan Sabha Constituency) हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार असतील, असे जाहीर केले होते. समरजित घाटगे हे सध्या भाजपमध्ये असून ते या जागेवरुन विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजपकडून त्यांना पक्ष सोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात असून बुधवारी धनंजय महाडिक यांनी समरजित घाटगे यांची भेट घेतली. मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही या भेटीनंतर समरजित घाटगे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीने एक प्रकारे संदेश दिला आहे की, माझा आणि महायुतीचा संबंध संपला. त्यामुळे आज होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट वक्तव्य समरजित घाटगे यांनी महायुतीबद्दल केले आहे. तर मी आता खूप पुढे गेलो आहे. मागे येणं शक्य नाही, असे समरजित घाटगे यांनी बुधवारी रात्री भेटीसाठी गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाला सांगितलं आहे.