Salman Khan Case :आरोपींनी तापी नदीत फेकलेलं 2 पिस्तुल 3 मॅगझिन सापडलं
सिनेअभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल शूटरने गुजरातच्या तापी नदीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गुन्ह्यांतील पिस्तुलासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तापी नदीत शोधकार्य हाती घेऊन एक पिस्तूल आणि काही काडतुसे जप्त केली. गोळीबारानंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुजरातच्या भूज येथून अटक केली होती. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोघांना अटक केल्यानंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलिस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याच चौकशीत त्यांनी गोळीबारानंतर गुन्ह्यांतील पिस्तूल गुजरातच्या तापी नदीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे कळले. गोळीबार प्रकरणात न्यायवैधक प्रयोगशाळेचा अहवाल एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे त्या पिस्तूलाचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी सकाळी गुन्हे शाखेचे बारा ते पंधरा जणांचे एक पथक गुजरातच्या तापी नदीजवळ दोन्ही आरोपींना घेऊन गेले होते. आरोपींच्या माहितीनंतर सुरत पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेने काही मच्छीमारांच्या मदतीने ते पिस्तूल शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. तापी नदीची खोली अरुंद आणि सतत वाहते पाणी असल्याने ते पिस्तूल शोधणे गुन्हे शाखेसाठी एक आव्हान होते. मात्र आता पिस्तूल सापडल्याने गुन्हे शाखेला महत्त्वाचा पुरावा मिळाल्याचे बोलले जात आहे.