Saamana on SC : 2014 नंतर देशात खोटं बोलणाऱ्यांचे दिवस, सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल
सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींची कानउघाडणी केल्याबद्दल 'सामना'मधून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 'सामना'ने म्हटले आहे की, खरे भारतीय कोण याचा छडा आता सुप्रीम कोर्टानेच लावावा. दोन हजार चौदा नंतर देशात खोटं बोलणाऱ्यांचे दिवस आले आहेत, असं 'सामना'च्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. खरं बोलणाऱ्यांना आणि सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना भारत विरोधी ठरवलं जात आहे. राहुल गांधींनी चीनने भारतात घुसखोरी केल्याचा आरोप केला, त्यामुळे ते सच्चे भारतीय आहेत का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला पडला असेल तर ते गंभीर आहे, असं 'सामना'ने म्हटलं आहे. त्यामुळे खरे भारतीय कोण, याचा छडा आता सर्वोच्च न्यायालयानंच लावावा, अशी मागणी 'सामना'ने केली आहे. यासाठी चीनच्या घुसखोरीवर सर्वोच्च न्यायालयात एखादी सत्यशोधन समिती स्थापन करेल का, असा सवालही 'सामना'ने विचारला आहे. "सरकारची तळी उचलतील ते देशभक्त आणि सरकारला प्रश्न विचारणारे देशद्रोही," अशी भलतीच प्रतिक्रिया दोन हजार चौदा नंतर देशात रूढ झाली आहे, यावर 'सामना'ने चिंता व्यक्त केली आहे.