MNS vs Shivsena vs BJP : पदवीधर निवडणुकीत, राडा महायुतीत! मनसे-शिवसेना-भाजप आमनेसामने
Maharashtra Legislative Council Elections 2024: मुंबई : भाजपकडून (BJP) विधानपरिषदेचे उमेदवार (Maharashtra Legislative Council Elections) जाहीर करण्यात आले आहेत. भाजप विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) एकूण तीन जागा लढणार आहे. मुंबई शिक्षक आणि पदवीधरसहित, कोकण पदवीधरवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. कोकण विभाग पदवीधरमधून निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई पदवीधरमधून किरण शेलार तर, मुंबई शिक्षकमध्ये शिवनाथ दराडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच भाजपकडून विधान परिषदेवर असलेले निरंजन डावखरेंचं काय होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसेनं जाहीर केलेला उमेदवार महायुतीचा की, मनसे स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे भाजपकडून राज ठाकरेंची मनधरणी केली जाणार का? अशाही चर्चा सुरू होत्या. अशातच आता भाजपनं विधान परिषदेसाठी यादी जाहीर केली आहे. कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेविरोधात भाजपने अखेर उमेदवार रिंगणात उतरवलाच
महायुतीत विधानसभेचं बिगुल वाजण्याआधीच जागांवरून रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच त्यापूर्वी राज्याच्या राजकारणात विधान परिषदेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी, भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केली. राज ठाकरेंची ही खेळी भाजपसाठी धक्का असल्याचं बोललं जात आहे. कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी अचानक अभिजीत पानसेंचं नाव जाहीर करून भाजपची पुरती गोची केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.