Prasad Lad on Ambadas Danve | अंबादास दानवेंच्या शिवीने रात्रभर झोप लागली नाही- प्रसाद लाड
Prasad Lad on Ambadas Danve | अंबादास दानवेंच्या शिवीने रात्रभर झोप लागली नाही- प्रसाद लाड विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्याबाबत विधिमंडळात अपशब्द वापरले. दानवे यांच्या याच शिवराळ भाषेवर आज प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ते आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकटेच आंदोलन करत होते. लाड यांच्या या भूमिकेनंतर आजचे विधिमंडळातील कामकाज वादळी ठरण्याची शक्यता आहे. माझ्या आई-बहिणीचा उच्चार केला हे चुकीचं "ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माझ्या आई-बहिणीचा उच्चार केला हे चुकीचं आहे. विरोधी पक्षनेत्याला हे किती योग्य वाटतं याचा विचार करायला पाहिजे. याबद्दल मला उद्धव ठाकरेंनादेखील विचारायचे आहे. मी स्वत: किती बहादूर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न दानवे यांनी केला. आम्ही सुद्धा लालबाग परळमध्ये मोठे झालो आहोत," अशा भावना लाड यांनी व्यक्त केल्या. आरोपीला अहंकार असेल तर तो कमी झाला पाहिजे तसेच "मी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकलंय. विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि माझी माफी मागितली पाहिजे. शिक्षा एक दिवस असेल किंवा एक तासाची असेल. प्रश्न हा आहे की आरोपीला अहंकार असेल तर तो कमी झाला पाहिजे. शिक्षा आणि राजीनामा झालाच पाहिजे. उद्धव ठाकरेंनी देखील यासंदर्भात जाब त्यांना विचारायला पाहिजे," अशी मागणी लाड यांनी केली.