Prakash Ambedkar | एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर : प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी टीका केली. पुण्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा आंदोलनाला पाठिंबा आहे, असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला आहे.
आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती हे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देतायत. ज्या व्यक्तिला घटना माहीत नाही, जो व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर कोणालाच मिळू नये याला भाजपने राज्यसभेवर कसं पाठवलं याचं आश्चर्य आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ते म्हणाले की, मराठा समाजाने महाराष्ट्राला आतापर्यंत खुप चांगले नेतृत्व दिले आहे. ते नेतृत्त्व सगळ्यांचा विचार करणारे होते. आता जे नेतृत्व करत असल्याचं दाखवतायत ते खुजे आहेत. स्वतःच आस्तित्व टिकवण्यासाठी जातीचा आधार घेत आहेत, असं आंबेडकर म्हणाले.