Prakash Ambedkar | मराठा आरक्षणासाठीच्या बंदला 'वंचित'चा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी टीका केली. पुण्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा आंदोलनाला पाठिंबा आहे, असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला आहे.
आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती हे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देतायत. ज्या व्यक्तिला घटना माहीत नाही, जो व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर कोणालाच मिळू नये याला भाजपने राज्यसभेवर कसं पाठवलं याचं आश्चर्य आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी फोन करुन 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यानुसार 10 तारखेच्या बंदला आमचा पाठिंबा असेल. हा पाठिंबा देताना मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण वेगळं आहे हे समजताच तो आम्ही त्यांना सांगितले आहे आणि ओ बी सी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे आम्ही सांगितलं आहे, असंही ते म्हणाले.