Old Pension Strike : कर्मचाऱ्यांची पेन्शन, मात्र जनतेला का टेन्शन? दोघांंचं भांडण नागरिकांना फटका
राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आणि महाराष्ट्रातील सरकारी कामकाजाचा रथ जिथल्या तिथं थबकून गेलाय. तर गावगाड्याची चाकंही ठप्प झालीयत. गाव-खेड्यातली, वाड्या-वस्त्यांवरची माणसं तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कामं घेऊन तर येतायत, मात्र तहसीलदार कचेऱ्या, जिल्हाधिकारी कार्यालयं, कृषी विभागासह सगळ्याच सरकारी कचेऱ्यांमध्ये संपामुळे कर्मचाऱ्यांचा पत्ताच नाही. त्यामुळे, कचेऱ्यांच्या बाहेर शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध मंडळींच्या जत्थेच्या जत्थे बसून आहेत. दिवसभर उन्हातान्हात ताटकळत बसायचं, बांधून आणलेला शिधा कचेरीच्या आवारातस बसून खायचा आणि सूर्य मावळतीला लागला की गावाकडे परतायचं... कर्मचाऱ्यांच्या संपामुळे असं सगळं धूळ पेरलेलं जगणं गावाकडच्या लोकांच्या वाट्याला आलंय. गेल्या काही दिवसांआधी अवकाळीने केलेला चिखल अजून पुरता सुकलेलाही नाहीय, त्याच्या नुकसानीचे पंचनामे आता कुठे सुरू होत होते, तर आता कर्मचाऱ्यांच्या संपाचा डोंगर आ वासून उभा राहिलाय. पंचनाम्यांच्या कामांनाही मोठा ब्रेक लागलंय. तर तिकडे, संपामुळे आरोग्य व्यवस्थाच सलाईनवर गेलीय. गरोदर महिला, आजारी माणसं, पोरं-टोरं, म्हातारी माणसं सरकारी दवाखान्यात येतायत, मात्र केस पेपर काढायला कर्मचारीच नाहीयत. एकाददुसरा डॉक्टर असला तरी, केस पेपरच नसल्यामुळे तो रुग्णाला हातही लावायला तयार नाहीय. त्यामुळे आजाराने खितपत पडलेले रुग्ण वेदना तशीच दाबत माघारी फिरतायत. हे सगळं होत असताना विद्यार्थीही संपाच्या त्रासातून सुटलेले नाहीयत. नागपुरात एका शाळेनं तर, शाळेत येऊ नका असं थेट बोर्डच लावून टाकलंय. एकूणच काय तर, या सगळ्या त्रासामुळे, कर्मचाऱ्यांची पेन्शन, मात्र जनतेला का टेन्शन असा सवाल आता विचारला जातोय.