Pankaja Munde PA Anant Garje Arrested : डॉ गौरी पालवे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणात पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी रविवारी रात्री 1 वाजता अनंत गर्जे यांना अटक केली. गेल्या काही तासांपासून अनंत गर्जे हे फरार होते. अखेर रात्री 1 वाजता गर्जे यांनी वरळी पोलिसांसमोर (Worli Police) आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे (Anant Garje) यांना अटक केली. अनंत गर्जे यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाईल. त्यावेळी अनंत गर्जे यांची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यावेळी पोलीस न्यायालयात नेमकी काय माहिती देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर अनंत गर्जे यांच्या वकिलांकडूनही जामीन मिळवण्यासाठी युक्तिवाद होईल. त्यामुळे आज न्यायालयात गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणाबाबत आणखी कोणती माहिती समोर येणार, हे बघावे लागेल. (Mumbai crime news)
वरळी पोलिसांनी गौरी पालवे गर्जे आत्महत्येप्रकरणी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.