Pandharpur : दाढ काढण्यापूर्वी केलेल्या उपचारानंतर महिलेचा मृत्यू, कुटुंबीयांचा डॉक्टरांवर आरोप
अक्कलदाढ काढायला आलेल्या महिलेचा जीव गेलाय. दाढ काढण्यासाठी केलेल्या उपचारानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. जयश्री चव्हाण असं मृत महिलेचं नाव आहे. अक्कलदाढ काढण्यासाठी डॉक्टरांनी जयश्री यांना भुलीचे इंजेक्शन दिले आणि दाढ काढली. अशक्तपणा जाणवू लागल्यानं डॉक्टरांनी एक गोळी दिली. त्यानंतर जयश्री यांना उलटी होऊन त्या बेशुद्ध झाल्या. यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच जयश्री यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्यामुळेच जयश्री यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी जयश्री यांचा मृतदेह पंढरपूर शहर पोलीस ठाण्यासमोर ठेवत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढली आणि अंत्यसंस्कार करण्यास सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टरच्या उपचारांबाबत चौकशीसाठी वैद्यकीय समितीची स्थापना केली आहे. आणि या समितीच्या अहवालानंतर पोलीस डॉक्टरविरोधात गुन्हा नोंदवण्याबाबत निर्णय घेणार आहेत.