Pandharpur Wari | आषाढी एकादशी: CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा, हरिनामात पंढरी दंग
आज आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूर नगरीमध्ये साजरा झाला. वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये दाखल झाले असून, संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला. देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोषाख परिधान करण्यात आला आणि त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली. विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत माहिती दिली. "कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, दुकानदार असो किंवा सामान्य माणूस, कोणाचेही नुकसान न करता सगळ्यांचे योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर तयार करणार आहोत," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, मंदिर व्यवस्थापनाबाबतही त्यांनी भाष्य केले. "मंदिर हातामध्ये असावे, मात्र या ठिकाणी कारभार खूप मोठा होतो. अशा ठिकाणी आपल्याला अशाप्रकारे कायदा करावा लागतो," असेही त्यांनी नमूद केले.