Pandharpur Flood Update | पंढरपूरवरचा महापुराचा धोका टळला, पण Chandrabhaga धोक्याच्या पातळीजवळ
पुणे परिसरातील पाऊस थांबल्यामुळे पंढरपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी झाल्याने पंढरपूरवरील महापुराचा धोका टळला आहे. मात्र, चंद्रभागा नदी अजूनही धोक्याच्या पातळीजवळ वाहत आहे. सध्या पात्रामध्ये एक लाख नव्वद हजार क्युसेकने पाणी वाहत आहे. गोपाळपूर पुलावर पाणी आल्यामुळे पंढरपूरहून कर्नाटकाकडे जाणारी वाहतूक काल रात्रीपासून बंद आहे. महापुरामुळे शहरातील आणि तालुक्यातील जवळपास शंभर पासष्ठ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने अनेक शेतांमध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. भीमा नदीकाठच्या अनेक गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.