Omraje Nimbalkar : Archana Patil यांच्यावर 43 दिवसांनी गुन्हा दाखल, निंबाळकरांचा प्रशासनाला इशारा
Omraje Nimbalkar : Archana Patil यांच्यावर 43 दिवसांनी गुन्हा दाखल, निंबाळकरांचा प्रशासनाला इशारा
धाराशिव : लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील मतदानाची सांगता झाली. त्यानंतर, आज लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात मतदान होत आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाबसह अनेक मतदारसंघात मतदान सुरू आहे. राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर महाराष्ट्रातील नेतेमंडळी शांत झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिका काही काळ संपल्याचं दिसून येत आहे. निवडणूक प्रचारात एकमेकांवर हल्लाबोल करणारे नेते आता निवडणूक निकालाची प्रतीक्षा करत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडून अद्यापही निवडणूक प्रचारकाळातील घटनांवर कारवाई होताना दिसून येते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना सभा घेतल्यामुळे अर्चना पाटील यांच्यावर प्रचारसभेच्या तब्बल 43 दिवसांनी हा गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना महायुतीच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, अर्चना पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनापरवाना सभा घेतल्याने आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. मात्र, हा गुन्हा तब्बल 43 दिवसांनी दाखल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. धाराशिवच्या आनंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अधिनियम कलम 188, 34 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.