Nilesh Chandra Maha Katta : फडणवीसांच्या सरकारमध्ये गद्दार नेते; योगी आदित्यनाथांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवा
मुंबई: भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुती सरकारवर जैन मुनी निलेश चंद्र यांनी अत्यंत वादग्रस्त आणि गंभीर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये 'गद्दार नेते' असल्याचे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली आहे.
जैन मुनी निलेश चंद्र हे 'माझा महा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी 'कबुतरखाना' आणि महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला.
धर्मासाठी शस्त्र उचलण्याचे आवाहन
यावेळी बोलताना जैन मुनी यांनी आणखी एक मोठे आणि वादग्रस्त विधान केले. "धर्म वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शस्त्र उचलायला पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.
'धर्मासाठी आम्हीच आमदार, खासदार उभे करू'
सध्याच्या नेतृत्वावर आणि नेत्यांवर टीका करताना, जैन मुनी निलेश चंद्र यांनी धर्मासाठी वेगळी राजकीय भूमिका घेण्याचे संकेत दिले. "धर्मासाठी आम्हीच आमदार, खासदार उभे करू आणि मोदींकडे जाऊ," असे विधान त्यांनी केले.
जैन मुनी निलेश चंद्र यांच्या या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महायुतीतील नेत्यांमध्ये मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.