Neeraj Chopra Reaction on Victory : खुप शिकायला मिळालं, अनेक वर्षांनी भारताला पदक मिळालं त्याचं आनंद
World Athletics Championships 2022 : ऑलिम्पिक (Olympic) सुवर्णपदक विजेता भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत तब्बल 19 वर्षानंतर नीरजनं भारताला पदक मिळवून दिलं. या स्पर्धेत त्याला सुवर्णपदकावर नाव कोरता आलं नाही, मात्र त्यानं कडवी झुंज देत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. नीरज चोप्राची पहिली भालाफेक फाऊल ठरली, मात्र त्यानंतर त्यानं जोरदार मुसंडी मारत चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर भाला फेकत रुपेरी कामगिरी केली. ग्रेनेडाच्या अँडर्सन पीटर्सनं 90.46 मीटर भाला फेकत सुवर्ण पदक पटकावलं. 2003 साली अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीचं कांस्यपदक जिंकलं होतं. मात्र त्यानंतर भारताच्या एकाही अॅथलीटला पदक जिंकता आलं नव्हतं, मात्र नीरजनं यंदा पदक जिंकत भारताचा या स्पर्धेतला पदकांचा दुष्काळ संपवला आहे.