'राष्ट्रवादीत आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते हे कळलं', Eknath Khadseचं खळबळजनक वक्तव्य
जळगाव : राष्ट्रवादी पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते याची आपल्याला माहिती मिळाली असल्याचं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केल्याने पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खडसे म्हणाले की, भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव केला हे मला राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर कळलं. खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका करताना आपण कुणाच्या कृपेने आमदार झाले याची आठवण ठेवावी. उगाच जामनेरवाल्याच्या कानातील कुरघोड्या ऐकत बसू नये, जामनेरवाल्यानेच आपल्या मागे ईडी लावली, वेगवेगळ्या चौकशा लावल्या,इन्कम टॅक्स लावल्या, रेड झाल्या, मात्र त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं. मात्र तरीही आता ईडी लावण्यात आली आहे, असं खडसे म्हणाले.
खडसे म्हणाले की, या ईडीने लावलेल्या चार्जशिटचा विचार केला तर आपल्यावर कलियुगात कुणी कुणावर लावले नसतील, इतके नको नको ते आरोप लाऊन, कुणाकुणाशी संबंध जुळवून आपल्याला मास्टर माईंड ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ दोन कोटी रुपयांच्या कर्जांसाठी ईडी लावण्यात आली. जे कर्ज आपण नियमानुसार व्याजासह फेडले आहे. सर्व सामान्य पणे ईडी कोणाला लावली जाते. ज्या ठिकाणी हजार बाराशे कोटी वर मनी लॉन्ड्रिंग झालं असेल. मात्र आपल्याला केवळ दोन कोटी रुपयांसाठी ईडी चौकशी लावण्यात आली आहे. केवळ छळण्यासाठी हे केले जात आहे, असं ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, जावयाला कोणताही संबंध नसताना अटक केली आहे. कोणत्याही परिस्थितीत नाथाभाऊला अटक करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केले जात आहेत. एक टक्का जरी खरं असेल तर आपण फाशी घ्यायला तयार आहोत. गेल्या चाळीस वर्षात कोणतीही तक्रार नव्हती. अचानक आपण बिघडायला का मी विश्वामित्र आहे. मी साधा माणूस आहे. मात्र मला बदनाम करण्याचे, चोर ठरविण्याचे हे जे काही षडयंत्र सुरू आहे हे मी भारी आहे म्हणून हे केले जात आहे, असंही खडसे म्हणाले.
गिरीश महाजन यांनी आपल्याकडे खडसे यांचे शंभर उतारे असल्याचं माध्यमांच्या पुढे म्हटलं होतं. यावर उत्तर देताना खडसे यांनी म्हटलं आहे की, आपल्याकडे जे आहे ते सर्व आपण इन्कम टॅक्सला दाखवलं आहे या मालमत्तेपेक्षा एक रुपया जरी जास्त माझ्याकडं निघाला तर माझी ती प्रॉपर्टी मी तुम्हाला दान द्यायला तयार आहे. आपण चाळीस वर्षात अनेक विकास काम केली. जिल्हापरिषद ताब्यात आली, ग्रामपंचायत समित्या आल्या, दूध संघ आला, जिल्हा बँक आली. त्या बदल्यात आपल्याला निवडणुकीत कधी तिकीट दिले जाणार नाही असं कधी वाटलं नव्हते. मात्र इतक्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी हा कृतघ्नपणा आपल्यासोबत केला आहे, असंही ते म्हणाले.